
नवरा-बायकोमधील वाद, टोकाचे निर्णय हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र बायकोने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या रागात एका व्यक्तीने सासूच्या कारचे टायर्स पंक्चर केल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस एका ४६ वर्षीय व्यक्तीचा शोध घेत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, परियारम पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी येथील अंचमपीडिका येथील रहिवासी दीपक कक्कणमणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर दीपक फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी घडली, जेव्हा तक्रारदार लीना सुकुमारन यांनी आपली कार येथील पिलाथरा परिसरातील एका कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये पार्क केली होती. त्या जेव्हा परत आल्या, तेव्हा त्यांना कारचे चारही टायर्स पंक्चर झाल्याचे आढळले. पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेट घातलेला दीपक कथितरीत्या चाकून कारचे टायर्स पंक्चर करताना दिसत आहे.
दीपकचे लग्न २०१० मध्ये सुकुमारन यांच्या मुलीशी झाले होते आणि २०२० मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरू झाले. त्यानंतर हे जोडपे वेगवेगळे राहू लागले आणि त्या महिलेने नुकताच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर दीपकने तिच्या कुटुंबीयांना अनेक वेळा धमकावले होते, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली. सायबर सेलच्या मदतीने पोलीस दीपकचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तपासाचा एक भाग म्हणून त्याच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.




























































