
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुचर्चित आत्मचरित्र ‘Belonging’ च्या हिंदुस्थानातील प्रकाशनाबाबत सुरू असलेली अनिश्चितता अखेर संपली आहे. HarperCollins India हे पुस्तक हिंदुस्थानात प्रकाशित करणार आहे. यापूर्वी Penguin Random House India (PRHI) ने पुस्तकाच्या मजकुरातील काही बदलांवरून प्रकाशन करारातून माघार घेतली होती. त्यानंतर हिंदुस्थानातील आवृत्ती कोण प्रकाशित करणार, याबाबत चर्चा सुरू होती.
सोनिया गांधी यांचे ‘Belonging’ हे आत्मचरित्र 10 नोव्हेंबर 2026 रोजी हिंदुस्थानात उपलब्ध होणार असून, याच दिवशी त्याचे आंतरराष्ट्रीय प्रकाशनही होणार आहे. अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चिलेल्या राजकीय आत्मचरित्रांपैकी हे एक मानले जात आहे.
या पुस्तकात प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपलेपणा या विषयांवर सोनिया गांधी यांनी वैयक्तिक अनुभव मांडले आहेत. तसेच त्यांच्या दृष्टीने हिंदुस्थानच्या राजकीय प्रवासाचे अंतरंग या आत्मचरित्रातून समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘पुस्तकातील मजकुरावर दबाव’ काँग्रेसचा आरोप
Penguin Random House India ने प्रकाशनातून माघार घेतल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला. काँग्रेस नेत्यांनी हा प्रकार राजकीय सेन्सॉरशिपचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी आरोप केला की, पेंग्विनवर पुस्तकातील काही भाग संपादित करण्यासाठी दबाव आणण्यात आला. या भागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील चीनकडून भारतीय भूभागाच्या कथित ताब्याशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.
गेहलोत यांनी या प्रकरणाला ‘लोकशाहीची हत्या’ असे संबोधले. तसेच, जगभरात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या आवृत्तीवर आक्षेप नसताना हिंदुस्थानातील आवृत्तीतच बदल करण्याची गरज का भासली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Penguin Random House कडून आरोपांना प्रत्युत्तर
दरम्यान, Penguin Random House ने काँग्रेसच्या राजकीय सेन्सॉरशिपच्या आरोपांना विरोध केला. प्रकाशकाने स्पष्ट केले की, पुस्तकाच्या हस्तलिखिताची तथ्य पडताळणी करणे आणि लेखकाला आवश्यक संपादनाच्या सूचना देणे हा प्रकाशकाचा अधिकार आहे. तसेच पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आपण अद्याप खुले असल्याचेही कंपनीने म्हटले.
HarperCollins India will publish Belonging: A Journey of Love by Sonia Gandhi. The long-awaited memoir will be published in India on 10 November 2026.
One of the most anticipated political memoirs of our time, Belonging is a dramatic and deeply personal story of love, identity,… pic.twitter.com/cNWuNRgXXP
— HarperCollins (@HarperCollinsIN) September 4, 2026





























































