कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर बलात्कार; रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Manipur Gang Rape Victim Passes Away After 2-Year Struggle for Life

ओडिशातील राऊरकेला रेल्वे स्थानकावर कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० वर्षीय प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ५४ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला गुरुवारी अटक करण्यात आली. कपिलेश्वर सिंह असे आरोपीचे नाव असून तो रेल्वेत व्हॉल्व्ह ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

या प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाने सिंह याला सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच त्याला निवृत्तिवेतनाशी संबंधित कोणतेही लाभ मिळणार नसल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (रेल्वे) आदित्य चौधरी यांनी सांगितले. तपासात पोलिसांना शक्य ती सर्व मदत रेल्वेकडून केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या दोन चुलत भावंडांसोबत बंगळुरूला जाण्यासाठी प्रवास करत होती. तिघांना सुरुवातीला तितलागड येथून हटिया-यशवंतपूर एक्स्प्रेसने प्रवास करायचा होता. मात्र, चुकून ते दुसऱ्याच रेल्वेत बसले. त्यानंतर त्यांनी राऊरकेला गाठले.

गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजता तिघे राऊरकेला रेल्वे स्थानकावर पोहोचले. बंगळुरूला जाण्यासाठी पुढील प्रवासाचे तिकीट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना कन्फर्म तिकीट मिळाले नाही.

दरम्यान, पीडित तरुणीचे चुलत भावंडे कन्फर्म तिकीट मिळण्याबाबत चौकशी करण्यासाठी गेली असताना आरोपी सिंह याने प्लॅटफॉर्मवर तरुणीशी संपर्क साधला. कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने तिला अधिकाऱ्यांच्या विश्रांतीगृहाजवळ असलेल्या एका ऑपरेटर रूममध्ये नेले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने खोली आतून बंद केली आणि तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची माहिती कोणाला दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्याने दिली. तसेच तिला २ हजार रुपये देण्याची ऑफरही केल्याचा उल्लेख या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आहे.

यानंतर सिंहने पुन्हा तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता तिने तेथून पळ काढला. तिने आपल्या चुलत भावंडांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिघांनी सरकारी रेल्वे पोलिसांकडे (GRP) धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कपिलेश्वर सिंह याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक कैलाश मुंडा यांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपी तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली आहे. दरम्यान, पीडित तरुणीला राऊरकेला येथील हिंसाचारग्रस्त महिलांसाठी असलेल्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. तिचा जबाब शुक्रवारी दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.