केस धुण्यासाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केसगळती रोखण्यासाठी आपण नानाविध उपाय करतो. बाजारात मिळणारे अनेक प्रोडक्टस आपले केस सुंदर होतील अशी आश्वासने केवळ देतात. परंतु या उत्पादनांमुळे अनेकदा आपल्या केसांची हानी होते. केस गळणे, कोंडा आणि केसांचा कोरडेपणा यामुळे अनेक जण वेगवेगळे शॅम्पू वापरून पाहतात. मात्र, प्रत्येक वेळी महागडा शॅम्पू खरेदी करण्याची गरज नसते. घरच्या घरी रीठा, आवळा आणि शिकाकाई यांचा वापर करून नैसर्गिक क्लिन्झर तयार करता येतो.

रीठ्यामध्ये नैसर्गिक सॅपोनिन असते. त्यामुळे केस आणि टाळूवरील तेल, धूळ आणि घाण स्वच्छ करण्यास मदत होऊ शकते. हा शॅम्पू तयार करण्यासाठी 8 ते 10 बिया काढलेले सुके रीठे, 5 ते 6 सुके आवळे, 5 ते 6 शिकाकाई आणि 2 ते 3 कप पाणी घ्यावे.

सर्व साहित्य पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे उकळावे. मिश्रण थंड झाल्यानंतर रीठा आणि शिकाकाई हाताने चांगले मळून घ्यावेत. त्यानंतर द्रावण गाळून स्वच्छ बाटलीत भरावे.

केस पाण्याने ओले करून हे द्रावण टाळूवर लावावा आणि हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. या नैसर्गिक शॅम्पूमध्ये बाजारातील शॅम्पूप्रमाणे जास्त फेस तयार होणार नाही.

मात्र, घरगुती शॅम्पू दीर्घकाळ साठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात तयार करून स्वच्छ पद्धतीने ठेवणे योग्य ठरते. टाळूवर खाज, जळजळ किंवा इतर त्रास जाणवल्यास वापर थांबवावा.