
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी लागू केलेली ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी कोकणकन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेने एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नुकतेच निवेदन सादर केले आहे.
शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विविध प्रवास सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने राज्यभरातील लाखो प्रवासी, महिला आणि विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कार्ड नोंदणी प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, ओटीपी न मिळणे, कार्ड रिचार्ज करताना येणाऱ्या अडचणी, आधार लिंकिंगमधील त्रुटी तसेच नोंदणी केंद्रांवर लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.येत्या गणेशोत्सव व दिवाळीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात हजारो नागरिक व भाविक प्रवास करतात. मात्र, नवीन कार्ड उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना पूर्ण तिकीट दराने प्रवास करावा लागत असून, हा प्रवाशांवर अन्याय असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक वयोवृद्ध नागरिक डिजिटल प्रक्रियेशी परिचित नसल्याने कार्ड नोंदणी व अपडेट करण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी अधिक कठीण ठरत आहे.
एनसीएमसी कार्डची वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत व सहज उपलब्ध होईपर्यंत या कार्डच्या सक्तीला तात्पुरती अथवा कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा महामंडळाचे जुने सवलत कार्ड दाखवून पूर्वीप्रमाणेच प्रवाशांना सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.एनसीएमसी कार्ड अनिवार्य करायचेच असल्यास प्रवाशांसाठी सुलभ नोंदणी व तक्रार निवारण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर विशेष कक्ष स्थापन करून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
या निवेदनाची प्रत राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे. प्रवाशांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन एसटी महामंडळ व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकणकन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालक ॲड. वृषाली धनराज सावंत, पूनम दत्तात्रय सावंत, ॲड. प्रियांका वाटेकर व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.




























































