भ्रष्टाचारी पुराच्या पाण्यात डुबक्या मारतायत, बिहारमधील पुरावरून तेजस्वी यादवांचा नितीश सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये गंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पाटण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पाटण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत बिहार सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “बिहारमध्ये पूर आला नसून तो आणला गेला आहे, जेणेकरून एनडीएचे नेते आणि भ्रष्टाचारी या पुराच्या पाण्यात डुबक्या मारू शकतील,” असा घणाघाती आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

दानापूरपासून ते पूरग्रस्त ग्रामीण भागापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून ज्या उपाययोजना असायला हव्यात, त्या जमिनीवर कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणाले.

दरवर्षी पूर नियंत्रण, तटबंदी, आपत्ती व्यवस्थापन आणि छावण्यांच्या नावावर ४ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. मग तरीही दरवर्षी बंधारे का फुटतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एनडीए सरकारकडे पूर नियंत्रणासाठी कोणतेही दीर्घकालीन नियोजन किंवा व्हिजन नसून, केवळ पूर आल्यावर देखावा करण्यापेक्षा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.