
राज्यभर डीजेच्या धोकादायक दणदणाटावरून वातावरण तापलेले असताना मुंबईत कोर्टाच्या आदेशानुसार डीजे आणि लेझर लाईटसला परवानगी नसल्याचे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही नियम मोडणाऱयांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पुण्याच्या लोहियानगरमध्ये पोलीस आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून मोठय़ा आवाजात डीजे लावणाऱया अल मदिना यंग बॉईज मंडळाला न्यायालयाने दणका देत दोषी ठरवून शिक्षाही सुनावली.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यात डीजे अणि लेझर लाईटवरून जोरदार वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज मुंबई पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सव निर्विघ्न आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केल्याचे ते म्हणाले. मुंबईत मुळात डीजेला परवानगीच नाही. त्यामुळे डीजेसाठी मुंबईत परवानगी मागितली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनिप्रदूषण नियम 2000 अंतर्गत ध्वनिक्षेपकासाठी मुंबईत आवाजाची मर्यादा आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पुण्याच्या लोहियानगरमध्ये नियम मोडून डीजे लावणाऱया अल मदिना यंग बॉईज मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जावेद मजीद शेख आणि डीजे साऊंड सिस्टम मालक प्रकाश अस्वले यांना न्यायालयाने दोषी ठरवत आज शिक्षा सुनावली.
खडक पोलिसांची धडक कारवाई
मंडळाने सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने खडक पोलिसांनी धडक कारवाई करत 24 तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यानंतर शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंडळाच्या अध्यक्षांसह तिघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
बंदी झुगारून मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात डीजेचा दणदणाट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदीचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी काढले असताना आज बडकस चौकात नियम धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट आणि लेझर शोमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी 7 वाजताच्या 80 ते 82 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. आता या ठिकाणी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
डीजेच्या आवाजाने भूकंप आल्यासारखा त्रास – मुख्यमंत्री
डीजेच्या आवाजाने भूकंप आल्यासारखा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी सरकार ध्वनिप्रदूषण रोखण्यास प्रयत्नशील आहे. डीजेचे स्तोम लवकरच संपेल. याबाबत चर्चेतून आता मार्ग काढत आहोत. पुढील काळात नक्कीच याबाबत धोरण आखले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजे वादावर मांडली. बापट यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे, असेही ते म्हणाले.
































































