
सदैव देवाच्या, म्हणजे सत्य- शिव- सुंदरतेच्या कामात जे आपला देह झिजवतात, त्यांची वाचा शुद्ध – पवित्र असते. जे स्वधर्माला अनुसरून विहित कर्मे करत असतात. तो सर्वोत्तमाचा दास धन्य आहे. हा श्लोक वाचताना सर्वोत्तम श्रीरामाचा सर्वोत्तम दास आपल्यासमोर उभा राहतो. समर्थांच्या मनातही हे गुण लिहिताना, रामभक्त मारुतीच समोर असणार. कारण, रामदासांनी लोकांना रामोपासानेबरोबरच रामभक्त मारुतीचीही उपासना सांगितली आहे. देवांना बंदीवान करणाऱया आणि अपहरण करणाऱया रावणाला ठार मारण्याचा व त्याचे चौदा चौकड्यांचे रावण राज्य-महाराज्य धुळीस मिळवण्याचा अतुलनीय पराक्रम रामचंद्राने केला असला तरी, त्या कामात सुग्रीव, जांबुवंत, नळ, नीळ इत्यादी वानर वीरांप्रमाणे त्यांच्यापेक्षाही अधिक सहाय्य मारुतीचे झाले. म्हणून त्यांचे महाकार्य शेवटास गेले. श्रीरामांनाही या गोष्टीची जाणीव होती. रामदासांनी लिहिलेल्या अंजनी गीत या काव्यात मारुतीची योग्यता श्रीराम स्वत किती मानत होते याचे यथार्थ वर्णन आहे. ‘लंकेहुनी अयोध्या येता। राम लक्ष्मण सीता। हनुमंते अंजनी माता। दाखविली रामा।।1।। चौघे केला नमस्कार। काय बोलले रघुवीर। माते तुमच्या कुमरे थोर। उपकार केला।।2।। माते तुझ्या उदरी जाणं। हनुमान जन्मला रत्न। एवढे माझे रामायण। याचे नी योगे।।3।।
>> संध्या शहापुरे




























































