
पावसाळ्यात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असताना मोखाडा उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य सेवा पांगळी झाली आहे. या रुग्णालयात २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तब्बल १३ वर्षांनंतर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले खरे मात्र रिक्त पदांमुळे रुग्णांची फरफट होत आहे. रुग्णालयात केवळ दोनच पदे भरण्यात आली असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात भार येत आहे. रिक्त पदे भरणार तरी कधी, असा सवाल मोखाडावासीयांनी विचारला आहे.
मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला २०१३ साली उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी देण्यात आली होती. मात्र गेल्या १३ वर्षांपासून रुग्णालयाचे काम रखडले होते. अखेर १५ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालय प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. ३० खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकूण २० पदे मंजूर आहे. यामध्ये ८ पदे शासनाकडून तर १२ पदे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत. शासनाकडून भरण्यात येणाऱ्या ८ पदांपैकी केवळ २ पदे भरण्यात आली असून ६ पदे रिक्त आहेत. तर बाह्यस्त्रोतातील ५ परिचारिका, ४ सफाई कामगार व तांत्रिक पदे अशी सर्व १२ पदे अद्यापही रिक्त आहेत.
रुग्णांची फरफट
तातडीच्या वैद्यकीय सेवेच्या वेळेस वैद्यद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे. रुग्णालयात केवळ एक भीषक (फिजिशियन) चे पद भरण्यात आले आहे. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपजिल्हा रुग्णालय होऊनही आरोग्य सेवा सलाईनवर आली आहे. वेळेत उपचार होत नसल्यामुळे गरजू रुग्णांना नाईलाजाने नाशिक आणि ठाण्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची तसेच खासगी रुग्णालयांची पायरी चढावी लागत आहे.
सोनोग्राफी मशीन धूळखात
रुग्णालयात सामाजिक संस्थेने सोनोग्राफी मशीन ऊपलब्ध करून दिली आहे. मात्र ही मशीन हाताळणारे तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. कंत्राटी पध्दतीने ते भरण्यात आले होते. परंतु त्यांचे दोन महिन्यांचे वेतन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने थकवल्याने ते गैरहजर आहेत. आता येथील सोनोग्राफी मशीन वापराविना धूळखात पडून आहे.
रिक्त पदांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे. तसेच पदभरती उपसंचालक व संचालक स्तरावरून होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय बाह्यस्स्रोताव्दारे भरवण्यात येणाऱ्या पदांची मंजुरी मंत्रालय स्तरावरून होईल.
डॉ. भरतकुमार महाले,
अधीक्षक, ऊपजिल्हा रुग्णालय,
मोखाडा.






























































