
केंद्र सरकारसोबत लडाखच्या मागण्यांसंदर्भात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने लडाखच्या प्रमुख मागण्यांवर ठोस तोडगा काढला नाही, तर लेह ॲपेक्स बॉडीला (LAB) व्यापक पातळीवर तीव्र जनआंदोलन छेडणे भाग पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सीमावर्ती भागातील जनतेला सावत्रपणाची वागणूक देणे सरकारने थांबवावे, असेही ते म्हणाले आहेत.
येत्या ९ सप्टेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत लेह ॲपेक्स बॉडीच्या उपसमितीची महत्त्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबरपासून नियोजित असलेली कारगिल ते लेह पदयात्रा सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र जर या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर ही पदयात्रा तात्काळ पुन्हा सुरू करण्यात येईल, असे वांगचुक यांनी म्हटले आहे. तसेच देशाच्या सीमेवर खंबीरपणे उभ्या असलेल्या लडाखच्या जनतेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशभरातील नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, लेह ॲपेक्स बॉडीतर्फे यंदाचा सप्टेंबर महिना शहीद महिना म्हणून पाळला जात आहे. गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकांना अटक करण्यात आली होती. स्वतः वांगचुक यांनाही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सहा महिने ताब्यात ठेवण्यात आले होते.



























































