
नागरिकांना आणि व्यावसायिक क्षेत्राला वेळेत व पारदर्शकपणे न्याय मिळणे ही कोणत्याही देशाच्या शाश्वत विकासाची पायाभरणी आहे, असे वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मंच परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वादांवर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी आणि लवादाच्या महत्त्वावर भर दिला. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, वेळेत आणि पूर्वानुमेय पद्धतीने मिळणारा न्याय जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करतो, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती देतो. न्यायव्यवस्थेतील विलंब टाळण्यासाठी आणि खटल्यांचा निपटारा जलद करण्यासाठी केवळ न्यायालयीन लढ्यावर अवलंबून न राहता मध्यस्थी हा सर्वात प्रभावी व सौहार्दपूर्ण मार्ग ठरू शकतो. मध्यस्थी म्हणजे केवळ तडजोड नसून दोन्ही पक्षांना मान्य असणारा आणि संबंध दृढ ठेवणारा शाश्वत तोडगा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्यावसायिक वादांचे वेगाने निराकरण व्हावे यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मध्यस्थी आणि लवादासाठी एक सामायिक व्यासपीठ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही सरन्यायाधीशांनी मांडला. यामुळे सीमापार व्यावसायिक व्यवहारांमधील विवादांवर तोडगा काढणे सोपे होईल आणि ब्रिक्स देशांमधील आर्थिक सहकार्य आणखी मजबूत होईल, असे ते म्हणाले.
याशिवाय न्यायदान प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यावरही परिषदेत चर्चा झाली. दरम्यान, नवी दिल्लीत ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, यूएई, इजिप्त आणि ब्राझीलसह ब्रिक्स सदस्य व भागीदार देशांतील सर्वोच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.



























































