मराठवाडा उद्धवस्त झालाय, तुमसे ना हो पायेगा म्हणत फडणवीस; सरकारवर कैलास पाटील यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा झालेल्या ४६ हजार कोटी रूपयाच्या कामापैकी मराठवाड्यात फक्त तीन हजार कोटी रूपये आतापर्यंत खर्च झाले. हे सरकार एक घोषणा करतं आणि त्याचा जाब विचारण्यापूर्वीच त्या कामाची त्याच्यापेक्षा मोठी दुसरी घोषणा करून टाकतं. फक्त आणि फक्त दिशाभूल केली जात आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारचे डोळे आता उघडावे लागतील. त्यासाठीच बीडमध्ये ७ तारखेला धरणे आंदोलन केले जाणार आहे. तर १७ तारखेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये आंदोलन होणार आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी दिली. बीडसोबतच धाराशिवमध्ये ही त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

कैलास पाटील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस सरकारच्या बोगस आणि दिशाभूल कामाचे धिंडवडे काढले. यावेळी बोलताना कैलास पाटील म्हणाले की, “हे सरकार सामान्य नागरिकांना आणि गोरगरिब जनतेला पावलापावलावर फसवत आहे. मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर पाऊस गायब झाला. पिकांची परिस्थिती भयावह आहे. विहिरीला पाणी आहे पण लाईट टिकत नाही म्हणून पिकांना पाणी देता येईना. खरीप हंगाम हातचा गेला आहे. अद्याप पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. गत तीन वर्षापासून पिकविमा नाही.”

ते म्हणाले, “पिकविमा मिळत नसल्याने यंदा शेतकर्‍यांनी विमाच काढला नाही. मोठमोठ्या घोषणा करून केवळ धूळफेक केली जात आहे. घोषणा करण्यात आलेले सिंचन प्रकल्प पूर्ण कधी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी बारा वर्ष होवूनही साधा डीपीआर तयार नाही. जलजीवन योजनामध्ये प्रचंड घोटाळे झाले आहेत. देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये झाला आहे.”