बारावी पास तरुण-तरुणींना करियरची संधी; पु. ल. देशपांडे कला अकादमीत टीव्ही, सिनेमाचे व्यावसायिक प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावी पास तरुण-तरुणींना टीव्ही, रेडिओ आणि सिनेक्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तीन महिने कालावधीच्या या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पु. ल. देशपांडे कला अकादमीत एडिटिंग, रेकॉर्डिंग आणि शूटिंगसह सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. या सुविधांचा राज्यातील मराठी तरुण-तरुणींना लाभ व्हावा या उद्देशाने अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी ती उचलून धरली. त्यांच्या सहकार्याने एप्रिल 2026 पासून प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाले. राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या अखत्यारीत हे अभ्यासक्रम होत असून पहिल्या बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. खासगी संस्थांच्या तुलनेत येथील प्रशिक्षण शुल्क खूपच कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते परवडू शकते, अशी माहिती अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख शेखर सरतांडेल यांनी दिली.

या कोर्सेसचा समावेश

स्क्रीनरायटिंग, फिल्म डायरेक्शन, बेसिक सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, व्हॉइसओवर आर्टिस्ट, लाइव्ह साऊंड रेकॉर्डिंग, असिस्टंट कोरिओग्राफर, फिल्म प्रॉडक्शन असिस्टंट, इव्हेंट प्रॉडक्शन अॅण्ड मॅनेजमेंट, फिल्म प्रॉडक्शन अॅण्ड मार्केटिंग.

टीव्ही, रेडिओ, सिनेमा या क्षेत्रांची आवड असलेल्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती येथे प्रशिक्षण देतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळतो. तूर्त आम्ही पाच अभ्यासक्रम सुरू आहेत. लवकरच इतरही सुरू होतील. प्रशिक्षणानंतर प्लेसमेंट देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.  – शेखर सरतांडेल, विभागप्रमुख, अभ्यासक्रम