
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रो अर्थात मेट्रो-3च्या प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात विविध सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार भुयारी मेट्रोमध्ये गणपतीच्या 18 इंच उंचीच्या मूर्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. स्क्रीनिंग मशीनमध्ये तपासणी करूनच बाप्पाची मूर्ती स्थानकात नेण्यात येणार आहे. त्यामुळे उंचीची मर्यादा घालण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई मेट्रो लाईन-3 म्हणजेच अॅक्वा लाईनचा उपयोग गणेशभक्तांकडून गणेशमूर्तींची ने-आण करण्यासाठी होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने श्रद्धा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध सूचनांचे माहिती पत्रक भुयारी मेट्रोच्या सर्व स्थानकांच्या परिसरात लावले आहेत. त्यानुसार गणपती बाप्पाच्या मूर्तीचा कमाल आकार 18 इंच उंच (मूर्तीच्या तळापासून सर्वोच्च बिंदूपर्यंत मोजलेला) निश्चित करण्यात आला आहे. तसेच मूर्ती ठेवलेल्या कंटेनरची तपासणी अनिवार्य करण्यात आली असून गणेशभक्तांना अंगझडती आणि सुरक्षा तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गर्दी जास्त असल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रो कर्मचारी मूर्ती घेऊन जाण्यावर नियंत्रण ठेवू शकतात किंवा तात्पुरते निर्बंध घालू शकतात. मूर्ती घेऊन प्रवास करणे ही प्रवाशाची स्वतःची जबाबदारी व जोखीम असेल, असे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे.
























































