
स्वच्छता हा केवळ भाषण, अभियान किंवा एका दिवसापुरता मर्यादित कार्यक्रम न राहता ती सामूहिक जबाबदारी बनविण्याचा निर्धार करत टिळक नगरमधील 300 गृहनिर्माण सोसायट्या एकत्र आल्या आहेत. या सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच ‘स्वच्छ मुंबई’ची प्रतिज्ञा घेतली.
टिळकनगर रेसिडेण्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरात आस्थाश्री सस्टेनेबिलिटी फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. दळवी यांनी गृहनिर्माण सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कचऱ्याकडे केवळ टाकाऊ वस्तू म्हणून न पाहता त्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर आणि सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी स्वतःच्या परिसरात प्रभावी कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभी करू शकते, असे दळवी म्हणाले. यावेळी अॅड. श्रीप्रसाद परब, अॅड. नितीन निकम, मधू कदम, गिरीश कांबळे, कार्तिक अय्यर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.





























































