
मुंबई लोकलच्या सर्व तिकीट आणि सर्व प्रकारच्या पासवर विमा संरक्षण देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने रेल्वे बोर्डाकडे केली आहे. समितीच्या मागणीची रेल्वे बोर्डाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई लोकलच्या प्रवाशांना विमा संरक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सद्यस्थितीत एक रुपयाचेही अपघाती विमा संरक्षण नाही. या गंभीर वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीचे आनंदा पाटील यांनी रेल्वे बोर्डाकडे विमा सुविधेची मागणी केली. लोकल ट्रेनचे खिडकीवर मिळणारे तिकीट, परतीचे तिकीट आणि यूटीएस अॅपद्वारे काढण्यात येणारे सर्व प्रकारचे तिकीट यावर अत्यल्प दरात ऐच्छिक विमा सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक पास तसेच विद्यार्थी पास अशा सर्व प्रकारच्या पासमध्ये केवळ 10-20 रुपये इतके अत्यल्प शुल्क जोडून अपघाती विम्याची सुविधा द्यावी, या विम्यात अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व व रुग्णालयीन खर्चाचा समावेश असावा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीतर्फे करण्यात आली. त्यावर यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असल्याचे उत्तर रेल्वे बोर्डाने दिले आहे.


























































