बाजारात अगरबत्त्यांचा दरवळ, भाव वधारला! पूजेचे साहित्य 10 ते 15 टक्क्यांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या काही दिवसांतच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार असून घरोघरी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवात वातावरण मंगलमयी, प्रसन्न आणि पवित्र ठेवण्यासाठी सुगंधी अगरबत्तीचा वापर आवर्जून केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत सध्या अगरबत्त्यांचा दरवळ पसरला असून दर्जेदार ब्रॅण्डना ग्राहकांची पसंती मिळत आहे. सगळेच महाग झाले असताना त्यात अगरबत्तीनेही भाव खाल्ला आहे.

बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांनी दादर, परळ, लालबाग भागात गर्दी करायला सुरुवात केली आहे. महागाईमुळे कापूर, धूप, अगरबत्ती, कंठी, हार यांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही व्यावसायिक व उत्पादकांनी ग्राहकांना दिलासा देत वस्तूंचे दर स्थिर ठेवले आहेत. पूजेचे साहित्य महागले असले तरी खरेदीसाठी भक्तांचा उत्साह कमी झाला नसून त्यांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पूजा साहित्य विक्रेते खामकर यांनी सांगितले.

कापूर, धुपाच्या किमतीतही वाढ

यंदा महागाईमुळे पूजा साहित्यांसोबतच कापूर आणि धूप यांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे. धुपच्या किमतीत किलोमागे सुमारे 200 रुपयांची वाढ झाली असून कापूर किलोमागे 250 व भीमसेनी कापूर 350 रुपयांनी वाढला आहे.

वाढलेले दर (किलो)

प्रकार       गेल्या वर्षीचे दर              यंदाचे दर

कापूर          800 ते 900        1000 ते 1400

भीमसेन कापूर                      1,000 ते 1,100         1,600

धूप             600 ते 1,200     800 ते 1,600

अगरबत्ती     600 ते 800        800 ते 1000

‘महाराजा’ला पसंती

दादर येथील प्रसिद्ध ‘महाराजा अगरबत्ती’ यांनी गणेशभक्तांसाठी हीना, स्वामी, पानडी, कस्तुरी, सॅण्डलवूड, ग्रीन मस्क, रॉयल उद, अनमोल, ड्रीम, पायनॅपल, लॅव्हेंडर, जस्मिन यांसारख्या अनेक प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती बाजारात उपलब्ध केल्या आहेत. स्वतःचे उत्पादन असल्याने या अगरबत्त्या ग्राहकांना अत्यंत रास्त आणि परवडणाऱ्या दरात मिळत आहेत. या अगरबत्त्या कोळसा आणि केमिकलविरहित असल्यामुळे त्यांच्यापासून धूर कमी होतो आणि सुगंध जास्त वेळ टिकून राहतो. याच कारणामुळे नागरिक या अगरबत्त्यांना मोठी पसंती देत आहेत.

सात वर्षांपासून दर स्थिर

श्रेयस शहा हे त्यांचे वडील अरविंद शहा यांच्यासोबत अगरबत्ती विक्रीचा गेल्या 40 वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. त्यांची ही तिसरी पिढी असून ते या अगरबत्त्या होलसेल, रिटेल व ऑनलाइन विक्री करत आहेत. त्यांच्याकडे सुगंधित अगरबत्तींसोबतच धूप स्टिक, कापूर, अत्तर आणि पूजेचे इतर साहित्यदेखील उपलब्ध आहे. स्वतःचा व्यवसाय असल्याने गेल्या सात वर्षांपासून अगरबत्तीचा दर स्थिर असल्याचे महाराजा अगरबत्तीचे व्यावसायिक श्रेयस शहा सांगितले.