
‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व मुंबईवरील हल्ल्याच मास्टरमाईंड मसूद अझहर अफगाणिस्तानात लपून कारवाया करत असल्याचा पाकिस्तानचा दावा तालिबानने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, मसूद अझहर अफगाणिस्तानमध्ये नसून आमच्या भूमीचा वापर इतर कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असा पुनरुच्चारही केला आहे.
हिंदुस्थानातील अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड
मसूद अझहर हा हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून, २००१ मधील संसद हल्ला, २००८ चा मुंबई २६/११ दहशतवादी हल्ला, २०१६ मधील पठाणकोट हवाई तळ हल्ला आणि २०१९ चा पुलवामा आत्मघाती बॉम्बस्फोट अशा भीषण हल्ल्यांचा तो मुख्य सूत्रधार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) मे २०१९ मध्ये त्याला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते.
FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे नाटक
पॅरिसस्थित ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (FATF) आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कारवाईवर जागतिक स्तरावर पुन्हा बारीक नजर ठेवली जात आहे. मनी लाँडरिंग आणि दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान २०१८ ते २०२२ या काळात FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये होता. या कारवाईपासून आणि आंतरराष्ट्रीय दबावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच मसूद अझहर ड्युरंड रेषा ओलांडून अफगाणिस्तानात पळून गेल्याचा दावा करत आला आहे.
ग्रे लिस्टमधून बाहेर पडताच पाकिस्तानची पलटी
२०२२ मध्ये अटी व शर्तींवर पाकिस्तानला FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढण्यात आले होते. मसूद अझहरवर कारवाई करणे आणि त्याला अटक करणे ही त्यातील एक प्रमुख अट होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच पाकिस्तानने एफएटीएफला दिलेल्या आश्वासनांवरून घूमजाव केले आहे. अझहरला अटक करण्यासाठी ठोस पावले न उचलता, तो देशातच नाही असा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे.





























































