
छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांची नावे बदलल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि मिंधे गटाने आता सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चौकांवर घाला घातला आहे. वरद गणेश मंदिराशेजारी आणि कार्तिकी हॉटेलसमोर असलेला शेतकऱ्याचा पुतळा हटवून त्या जागेवर आता ‘कमळ चौक’ विकसित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आम्हीच कैवारी असल्याचा भाजप, मिंध्यांचा दावा बेगडी असल्याचे सत्य समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरात नगरपालिका असताना तत्कालीन नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यागाची साक्ष देणारा हा पुतळा उभारला होता. हातात ज्वारीचे कणीस असलेला हा पुतळा केवळ शिल्प नसून अन्नदात्याबद्दल असलेल्या आदराचे, कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून उभारण्यात आला होता. मात्र सौंदर्याकरणाच्या नावाखाली शेतकरी अस्मितेचे प्रतिक असलेला हा पुतळा हटवण्याच्या हालचाली भाजप तसेच मिंधे गटाने चालू केल्या आहेत.
महावीर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता हा व्हीआयपी म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर वरद गणेश मंदिर चौकात हा शेतकरी पुतळा आहे. याच रस्त्यावरून सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या व्हीआयपींची वर्दळ असते. या पुतळ्यामुळे कुणाच्या भावना दुखावत नाहीत, वाहतुकीचा खोळंबा होत नाही. या पुतळ्याबद्दल कोणताही वाद नाही. मग हा पुतळा हटवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
वरद गणेश मंदिर चौकातील ‘कमळ’ विकसित करण्यासाठी कामाची संचिका दाखल झाली आहे. ही संचिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. परंतु, आयुक्तांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे शहरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापौरांना पुतळ्याचे वावडे?
भाजपचे महापौर समीर राजूरकर यांच्या समर्थनगर प्रभागातच हा शेतकरी पुतळा आहे. या पुतळ्यासमोरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब पवार यांचाही पूर्णाकृती पुतळा आहे. शेतकऱ्याचा पुतळा भुईसपाट करून त्या जागेवर कमळाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. हा पुतळा हटवण्यासाठी भाजपतील एका गटाने पुढाकार घेतला आहे. एरव्ही अमेरिकेपासून बारूदगरनाल्यापर्यंत गप्पांचा फड जमवणाऱ्या महापौरांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे का? की महापौरांनाच शेतकरी पुतळा नकोसा झाला आहे? असा प्रश्न त्यांच्याच प्रभागातील लोकांना पडला आहे.
- कृष्णा भोगे मनपा आयुक्त असताना शहरातील चौकांचे सौंदर्याकरण करण्यात आले होते. सौंदर्याकरण करण्याचा हेतू तेथे उभारण्यात आलेल्या विलोभनीय शिल्पकृतींमुळे नागरिकांना प्रेरणा मिळावी हाच होता. कमळ ही भाजपची निवडणूक निशाणी आहे. यापासून कोणती प्रेरणा घ्यायची… पक्ष फोडाफोडीची? ‘नीट’ पेपर घोटाळ्याची? घटनेची पायमल्ली करण्याची? असे प्रश्न नागरिकांना पडल्यास नवल नाही.


























































