सामना अग्रलेख – प्रे. ट्रम्प यांची खैरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रे. ट्रम्प यांनी अमेरिकेत व पंतप्रधान मोदी यांनी भारतात सुरू केलेल्या ‘रेवड्या’ संस्कृतीने लोकशाही आणि मानवतेला लाज आणली आहे. भारतात 80 कोटी जनता आजही मोदी देत असलेल्या महिन्यास 10 किलो फुकट धान्य योजनेवर जगत असेल तर प्रगती झाल्याची बोंब ते कशी ठोकू शकतात? प्रे. ट्रम्प यांनाही अमेरिकेला महान बनवायचे होते. तसे त्यांनी वारंवार बोलून दाखवले. प्रत्यक्षात ट्रम्प यांनी स्वतःचा उद्योग, व्यापार वाढवला व सामान्य अमेरिकन नागरिकांना भिकारी केले. भारतात जे मोदी-शहा वगैरे लोक करत आहेत तेच प्रे. ट्रम्प अमेरिकेत करत आहेत. सरकारी तिजोरी फोडा, लुटा, रेवड्या वाटा व निवडणुका जिंका! इकडे ‘लाडक्या बहिणी’ तर तिकडे अमेरिकेत ‘लाडके प्रौढ.’ योजना आणि लाभार्थी वेगळे असले तरी सरकारी तिजोरीतून करायच्या खैरातीचा पॅटर्न सारखाच आहे!

भारताप्रमाणे अमेरिकेलाही भिकेचे डोहाळे लागले आहेत व येनकेनप्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी प्रे. ट्रम्प यांनी ‘रेवडी’ योजनांची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डलासमधील एका निवडणूक रॅलीत सांगितले की, रिपब्लिकन पक्ष नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांत विजयी झाला तर प्रत्येक अमेरिकन ‘अ‍ॅडल्ट सिटिझन’ म्हणजे प्रौढ नागरिकाच्या खात्यावर पाच हजार डॉलर जमा होतील. हे पैसे त्याने अमेरिकेतच खर्च करावेत. या अनोख्या योजनेस नाव दिले आहे ‘ट्रम्प डिव्हिडंड’ याचा सरळ अर्थ असा की, प्रे. ट्रम्प हे सरकारी तिजोरीचा वापर करून मते विकत घेणार आहेत. जगातील सर्वात मजबूत वगैरे लोकशाहीचे हे धिंडवडे प्रे. ट्रम्प यांनी काढले आहेत. इराण युद्धात नाहक उडी मारल्याने अमेरिकन जनता ट्रम्पवर नाराज आहे. युद्धामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कमजोर पडली आहे. महागाई, रोजगार, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तेथे गंभीर बनला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे काम करून दाखवलेले नाही. धमक्या, युद्ध किंवा व्हेनेझुएलासारख्या लहान राष्ट्रांवर ताबा मिळवून तेथील तेल विहिरींवर कब्जा मिळवणे, एवढेच त्यांनी केले. जगभरातील काही मानसिक गुलाम राष्ट्रे ट्रम्प यांच्या या माकडचेष्टांवर टाळ्या वाजवत आहेत, पण इराणसारख्या राष्ट्राने प्रे. ट्रम्प यांच्यापुढे न झुकता त्यांना धडा शिकवला व युद्धात झुंजवत ठेवले. त्यामुळे जगात अमेरिकेचे हसे झाले. या सगळ्याचा परिणाम मध्यावधी निवडणुकीत दिसेल व आपण सत्ता गमावू, अशी भीती ट्रम्प यांना वाटू लागली आहे. त्यामुळे मते विकत घेण्याची ‘मोदी युक्ती’ ट्रम्प यांनी स्वीकारलेली दिसते. चार दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी 10 लाख भारतीयांना मतदार यादीतून वगळण्याचे आदेश दिले. भारतात जे मोदींविरुद्ध वातावरण पेटले आहे, ते वारे अमेरिकेत पोहोचतील व भारतीय आपल्याला

मतदान करणार नाहीत

या भीतीतून ट्रम्प यांनी भारतीय व इतर आंतरराष्ट्रीय समाजाची मते वगळण्याचा निर्णय घेतला. भारतात ‘एसआयआर’च्या आवरणाखाली नेमका हाच लोकशाहीविरोधी प्रकार चालला आहे. भारतातल्या निवडणुका म्हणजे सत्ताधारी-निवडणूक आयोगाच्या गुन्हेगारी संगनमताचा खेळ बनला आहे. प्रे. ट्रम्प महान अमेरिकेला त्याच मार्गाने नेताना दिसत आहेत. पाच हजार डॉलर्सची ‘लाच’ देऊन ते ‘प्रौढांची’ मते विकत घेणार आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीत दिलेले हे आश्वासन पूर्ण करण्याचे ठरवले तर एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त बोजा त्या देशाच्या तिजोरीवर पडेल. जगातील 170 देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा ही जास्त रक्कम ट्रम्प मतदार विकत घेण्यासाठी एका रात्रीत वाटणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे पोहोचले आहे. वार्षिक तूट 1800 अब्ज डॉलर आहे. पुन्हा ही ‘रेवडी’ वाटण्यासाठी काँग्रेसची मंजुरी लागेल. ट्रम्प यांनी पाच हजार डॉलर्स प्रौढ अमेरिकन नागरिकांना वाटण्याची घोषणा करताच त्यांच्याच पक्षाचे मंत्री व नेते चक्रावले. उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी तर कपाळावर हात मारला. वान्स म्हणाले, ‘‘व्यवस्थित छाननी करून हे पैसे वाटले जातील. कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. श्रीमंत प्रौढांना याचा लाभ मिळणार नाही.’’ म्हणजे मोदींप्रमाणे घोषणा करायच्या. मग अटी, शर्ती अशा क्लृप्त्या वापरून वेळ काढायचा. ट्रम्प यांची प्रौढ अमेरिकन नागरिकांना पैसे देण्याची घोषणा म्हणजे निवडणुकीच्या खुल्या बाजारातील सगळ्यात मोठी रेवडी आहे. “If the Republicans win, you win with us and you get 5,000 dollars,” ही ट्रम्प यांची घोषणा म्हणजे मतांचा थेट सौदा आहे. याच अमेरिकेने कधीकाळी भारतीय अर्थव्यवस्थेतील

रेवडी संस्कृतीची खिल्ली

उडवली होती. भारतासारखा कर्जबाजारी देशही याच ‘रेवड्या’ वाटून निवडणुका जिंकत आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे वचन दिले होते. त्यावर मते मिळवली. ते 15 लाखांचे वचन अद्यापि पूर्ण झालेले नाही. मोदी हे प्रत्येक निवडणुकीत काही ना काही रेवड्या वाटत फिरतात व लोक त्या रेवड्यांना भुलतात. महाराष्ट्रात लाडकी बहीण, मध्य प्रदेशात लाडली बहना, हरयाणात लाडी लक्ष्मी, प. बंगाल, तामीळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, दिल्ली, गोव्यात अशा रेवड्या वाटून मते विकत घेतली. आपल्या देशात बेरोजगारी, महागाई वाढतेय. कर्जाने शेतकरी मरतोय, आंदोलने सुरू आहेत. मात्र यावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. प्रे. ट्रम्पही त्यांच्या देशातील दुरवस्थेवर ‘ब्र’ काढत नाहीत. जनतेच्या तिजोरीची लूट करून निवडणुका जिंकायच्या. त्या लुटीत निवडणूक आयोगाने ‘हाथ की सफाई’ करून घ्यायची. सध्या जगभरात हेच चित्र दिसत आहे. प्रे. ट्रम्प यांनी अमेरिकेत व पंतप्रधान मोदी यांनी भारतात सुरू केलेल्या ‘रेवड्या’ संस्कृतीने लोकशाही आणि मानवतेला लाज आणली आहे. भारतात 80 कोटी जनता आजही मोदी देत असलेल्या महिन्यास 10 किलो फुकट धान्य योजनेवर जगत असेल तर प्रगती झाल्याची बोंब ते कशी ठोकू शकतात? प्रे. ट्रम्प यांनाही अमेरिकेला महान बनवायचे होते. तसे त्यांनी वारंवार बोलून दाखवले. प्रत्यक्षात ट्रम्प यांनी स्वतःचा उद्योग, व्यापार वाढवला व सामान्य अमेरिकन नागरिकांना भिकारी केले. भारतात जे मोदी-शहा वगैरे लोक करत आहेत तेच प्रे. ट्रम्प अमेरिकेत करत आहेत. सरकारी तिजोरी फोडा, लुटा, रेवड्या वाटा व निवडणुका जिंका! इकडे ‘लाडक्या बहिणी’ तर तिकडे अमेरिकेत ‘लाडके प्रौढ.’ योजना आणि लाभार्थी वेगळे असले तरी सरकारी तिजोरीतून करायच्या खैरातीचा पॅटर्न सारखाच आहे!