इराण सरेंडर होणार नाही; हिंदुस्थानच्या भूमीवरून इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला भरला दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानमध्ये आले आहेत. याच दरम्यान त्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या वाढत्या दबावापुढे इराण झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर अण्वस्त्र निर्मितीबाबत अमेरिकेने केलेले आरोपही पेझेश्कियान यांनी फेटाळून लावले. तसेच इराणच्या सैन्याशी थेट मुकाबला करण्याऐवजी अमेरिका आणि इस्रायल सामान्य नागरिक, अन्नपुरवठा आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मसूद पेझेश्कियान यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत अमेरिका-इस्रायलच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला. अमेरिकन नागरिक स्वतःला योद्धे समजत असतील, तर त्यांनी आमच्या शूर सैन्य दलांचा सामना करावा. सामान्य नागरिकांच्या पायाभूत सुविधा, अन्नपुरवठा आणि जीवनमानावर युद्ध लादण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच जर तुमच्यात माणुसकी असेल, तर लोकांना अन्न, पाणी आणि औषधांपासून का वंचित ठेवले जात आहे? इराणी जनतेला धमकावून झुकवता येणार नाही, इराण कधीही शरण जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

पेझेश्कियान यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. अमेरिका आणि इस्रायल इराणवर लष्करी हल्ला करण्यासाठी अणुकार्यक्रमाचे खोटे कारण पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला जर अण्वस्त्रेच तयार करायची असती, तर आम्ही अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचेसदस्य झालोच नसतो. आमचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच सुरू आहे आणि एनपीटीच्या चौकटीत राहून चर्चा करण्यास इराण आजही तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसोबतच्या संबंधांवर बोलताना पेझेश्कियान यांनी थेट चर्चेची शक्यता तुर्तास फेटाळून लावली. 28 फेब्रुवारी रोजी युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास पूर्णपणे उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.

…जेव्हा मलेशियाचे पंतप्रधान किशोर कुमार यांचे गाणे गातात, BRICS मध्ये जेवणानंतर रंगली मैफिल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आता थेट बोलणे अतिशय कठीण आहे. त्यांनी कोणत्या आधारावर आमच्या नेत्याची हत्या केली? हे आमच्या समाजासाठी स्वीकारणे अत्यंत वेदनादायी आहे, असे ते म्हणाले. तसेच यापूर्वी अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य कराराचे पालन वॉशिंग्टनने केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

इस्रायली पंतप्रधानांच्या मेकअपवर 4 कोटी खर्च, तीन महिन्यांत केसांवर 22 लाख उडवले