
मराठा आरक्षणासाठी 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी 15 सप्टेंबरला मुंबईकडे पूच करण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र पोलिसांनी त्यांना मुंबईत नो एण्ट्री केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करू असे हमीपत्र जरांगे यांनी दिले. पण पूर्वानुभव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव आंदोलनाला परवानगी देता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले.
14 सप्टेंबरला गणपतीची स्थापना करा आणि 15 सप्टेंबरला मुंबईसाठी रवाना व्हा असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले आहे. पाच ठिकाणी रात्रीचा मुक्काम करत 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचण्याचा त्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. पोलिसांच्या अटी-शर्थींचे पालन करून शांततेत आंदोलन करू अशी हमी त्यांनी वकिलांच्या मार्फत पोलिसांना दिली. त्यानंतरही ऐन गणेशोत्सवाचा काळ आणि पोलिसांवर असलेली सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी पाहता आंदोलनाला परवानगी देता येणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी जरांगे यांच्या गेल्या वर्षीच्या मुंबईतील आंदोलनाचा दाखलाही दिला आहे.
बावनपुळे बाईच्या पदराआडून वार करतात
मनोज जरांगे यांनी भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांच्यावर सडपून टीका केली आहे. बावनपुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत, त्यांचे अधिकारी आता शनिवारी आणि रविवारीही काम करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी बावनपुळेंवर निशाणा साधला. पाऊस असो किंवा ऊन, मराठा समाज मुंबईत येणारच, अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. बावनपुळे यांच्या यंत्रणेमार्फत मराठा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा केला. नोटिसा, चौकशा किंवा दबाव आणून आंदोलन थांबणार नाही, उलट आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मरण पत्करेन, पण शरण येणार नाही
आंदोलनाला परवानगी नाकारली गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मराठा मोर्चात गुंड घुसवायचे आणि गोंधळ निर्माण करून मला गोळय़ा घालायचा दोघांचा कट शिजला आहे, त्यांच्याच काही मराठा आमदारांनी आपल्याला ही माहिती दिली, पण गोळय़ा घातल्या, जेलमध्ये टाकले तरी आता माघार घेणार नाही. मरण पत्करेन, पण सरकारला शरण येणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.



























































