
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणारे गणेशभक्त सलग तिसऱ्या दिवशीही आज वाहतूककोंडीत अडकले. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात वाहनांच्या चार किलोमीटर लांब रांगा लागल्या. वाहतूककोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने मुंबई-माणगाव या चार तासांच्या प्रवासासाठी सुमारे दहा ते अकरा तासांचा कालावधी लागला. त्यामुळे पोलिसांनी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केलेले नियोजन फक्त कागदावरच राहिल्याने कोकणवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच पुणे परिसरातून कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना माणगावपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वाहनांचा वेग अक्षरशः मंदावल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. अनेक कुटुंबांना तासन्तास वाहनांमध्येच ताटकळावे लागले. इंदापूर-माणगाव परिसरात वाहतूककोंडीची समस्या गेल्या तीन दिवसांपासून जाणवत आहे. शुक्रवारीही या भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती. शनिवारी या भागात वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यानंतर रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा आधार घेतला. मात्र वाहनांचा वाढता ताण इतका मोठा होता की, पर्यायी मार्गांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढून ते मार्गदेखील जाम झाले. त्यामुळे मुख्य महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनचालकांना पर्यायी मार्गावरही कोंडीचा सामना करावा लागला.
राजापूरच्या हातिकले येथे टेम्पो ट्रॅव्हल्स अपघातात मुंबईहून मालवणला निघालेले 16 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दहा जण गंभीर आहेत. याशिवाय खेड आणि कणकवली तालुक्यांत झालेल्या अपघातांत प्रत्येकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईहून गावी आलेल्या देवरुख येथील 25 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.



























































