
मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाने अक्षरशः धुमशान घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पावसाचा जोर वाढल्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संपूर्ण गणेशोत्सवात पाऊस धिंगाणा घालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अनेक जिह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.
मागील महिनाभर पावसाचा जोर कमी झाला होता. या काळात उकाडय़ाने नागरिकांना हैराण केले होते. श्रावण सुरू होताच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या. मात्र गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत अविश्रांत पाऊस कोसळला. या पावसाने गणेशभक्तांचा हिरमोड केला. गणरायाला उत्साहात मंडपात आणण्याचे गणेशभक्तांचे नियोजन कोलमडले आणि घाईघाईत गणरायाची मिरवणूक काढावी लागली. पुढील आठवडाभरात अनेक जिह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 40-50 किमी वेगाने सोसाटय़ाचे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी पावसाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत कोकणाला झोडपले. पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-ठाण्यातून गौरी-गणपती सणासाठी कोकणात गेलेल्या गणेशभक्तांची उत्सवाची तयारी करताना प्रचंड तारांबळ उडाली.
मुंबई शहर व उपनगरांत पावसाचा जोर
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढणार आहे. संपूर्ण महानगर क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाची संभाव्य स्थिती लक्षात घेत मुंबई आणि आसपासच्या परिसराला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लोकलची रखडपट्टी, रस्त्यांवर वाहतूक काsंडी
मुंबईत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दक्षिण मुंबईत दादर, परळ, लालबाग, गिरगाव आणि भायखळा परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने धुमशान घातले. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली. त्याचा लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या, तर पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक काsंडी झाली. यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांना बाप्पाची आगमन मिरवणूक घाईघाईत उरकावी लागली.
























































