ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा हिंदुस्थानच्या विजेतेपदाची हॅट्ट्रिक! चीनला धूळ चारत विश्वचषकाचे तिकीटही पक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी ज्युनियर महिला हॉकी संघाने पुन्हा एकदा आशियावर आपली दादागिरी सिद्ध केली. अंतिम सामन्यात यजमान चीनचा १-० असा धुव्वा उडवत हिंदुस्थानने ज्युनियर महिला आशिया कपवर सलग तिसऱ्यांदा नाव कोरले. सानिका मानेने १७व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयासाठी पुरेसा ठरला.

चीनच्या मैदानावर चीनलाच नमवत हिंदुस्थानी पोरींनी आशियाई हॉकीवर आपले वर्चस्व कायम ठेवले. या विजेतेपदासोबतच हिंदुस्थानने एफआयएच ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचेही तिकीट बुक केले. सुरुवातीच्या टप्प्यात चीनने चेंडूवर अधिक ताबा मिळवत हिंदुस्थानी संघावर दबाव निर्माण केला. मात्र, दबाव झुगारून हिंदुस्थानी पोरींनी खेळाचा गियर बदलला आणि सानिकाने मिळालेल्या संधीचे सोने केले. तिच्या गोलनंतर भारतीय बचावफळीने चीनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही आणि अखेर भारताने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली.

हिंदुस्थानी संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला ५-१, तर उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानला तब्बल १९-० असे लोळवले. साखळीत यजमान चीनविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधल्यानंतर हिंदुस्थानने जपानचा ७-०, मलेशियाचा ११-१ असा फडशा पाडला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण कोरियावर ४-१ अशी मात केली होती.

ज्युनियर महिला आशिया कपच्या इतिहासात दक्षिण कोरियाने चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. हिंदुस्थान आणि चीनच्या खात्यावर आता प्रत्येकी तीन विजेतेपदांची नोंद आहे. हिंदुस्थानने २०२३, २०२४ आणि २०२६ मध्ये हा किताब पटकावला. चीनला मात्र सहा वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. जपानला अद्याप या स्पर्धेत विजेतेपदाची चव चाखता आलेली नाही.

विजेत्या पोरींवर बक्षिसांचा वर्षाव

विजेतेपदाचा जल्लोष संपतो न संपतो तोच ‘हॉ की इंडिया’ने हिंदुस्थानी संघातील प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. याचबरोबर सपोर्ट स्टाफलाही दीड लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.