
बस अपघाताचे वार्तांकन करताना वृत्तवाहिनीचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडली. बहुमजली इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिसच्या सॅन फर्नांडो व्हॅली भागातील चॅट्सवर्थ येथे मंगळवारी एसयूव्ही आणि सिटी बसची धडक झाली. यात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. या अपघाताचे थेट प्रक्षेपण आणि वार्तांकन एका वृत्तवाहिनीच्या हेलिकॉप्टरमधून सुरू होते. थेट प्रक्षेपणादरम्यान सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक हेलिकॉप्टर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये कोसळले.
अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे चार वाहने आणि दोन स्टोरेज कंटेनर्सचे नुकसान झाले. ‘नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड’ आणि ‘फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्था या अपघाताची चौकशी करतील.

























































