कांजूरगावमधील पुनर्विकासात 39 झाडांवर पुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांजूरगाव एलबीएस मार्गावरील एका इमारतीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पासाठी 39 झाडांवर पुऱ्हाड कोसळणार आहे. यामध्ये 24 झाडे तोडण्यास तर 15 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

या झाडांची भरपाई म्हणून तब्बल 707 नवीन झाडे लावण्याची अट घालण्यात आली आहे. यामध्ये झाडतोडीच्या बदल्यात 430 तर पुनर्रोपित झाडांच्या बदल्यात 277 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार बाधित झाडांमध्ये जांभूळ, नारळ, अशोक, बदाम, उंबर, आंबा, पिंपळ, बेल आणि कडुलिंब आदी विविध प्रजातींचा समावेश आहे. पुनर्विकास कामामुळे या झाडांवर परिणाम होणार आहे.

निकषांचे पालन बंधनकारक

उपलब्ध जागेत पारंपरिक तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन झाडे लावताना आवश्यक अंतर, योग्य प्रजातींची निवड आणि पर्यावरणीय निकषांचे पालन करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. तसेच विकासकामामुळे प्रभावित झालेल्या झाडांची भरपाई करणे आणि वृक्ष प्राधिकरणाने घातलेल्या सर्व अटींची अंमलबजावणी करणे ही विकासकाची जबाबदारी राहणार आहे.