प्लॅस्टिक बंदी कारवाईत नऊ कोटींच्या दंडाची वसुली, पालिकेकडून 122 टन माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू ठेवलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांनी 23 जून 2018 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत मुंबईतील दुकाने, आस्थापना आणि बाजारांमध्ये तब्बल 29 लाख 28 हजार 732 ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान 1 लाख 22 हजार 113 किलोग्रॅम (सुमारे 122 टन) प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांकडून 9 कोटी 40 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभाग, अनुज्ञापन विभाग आणि बाजार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत एकूण 18,768 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी सिंगल यूज आणि प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा यापुढील काळात कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा सक्त इशारा महापालिकेने दिला आहे.

अनुज्ञापन विभागाने 9 लाख 85 हजार 682 ठिकाणी तपासणी करून 19,553 किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 2,820 प्रकरणांतून 1 कोटी 41 लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर बाजार विभागाने 9 लाख 89 हजार 316 बाजारांतील गाळ्यांना भेटी देऊन 1,281 किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करत 700 प्रकरणांतून 35 लाखांचा दंड वसूल केला.

 दुकाने व आस्थापना विभागाने 1 एप्रिल 2025 ते 31 जुलै 2026 या 16 महिन्यांच्या काळात मुंबईतील 24 प्रभागांमध्ये (वॉर्ड) विशेष मोहीम राबवली. या कालावधीत 1 लाख 15 हजार 830 दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात 7,505 किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करून 1 कोटी 30 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात के-पश्चिम, के-पूर्व, एल आणि एम-पूर्व या वॉर्डांमध्ये सर्वाधिक जप्ती आणि कारवाईची नोंद झाली.

दुकाने व आस्थापना विभागाने सर्वाधिक 9 लाख 53 हजार 734 भेटी देऊन 1 लाख 1 हजार 278 किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले. या विभागाकडून 15,248 प्रकरणांमध्ये 7 कोटी 64 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

अशी झाली कारवाई

कालावधी   : 1 एप्रिल 2025 ते 31 जुलै 2026

एकूण भेटी : 1,15,830

जप्त प्लास्टिक                      : 7,505.265 किलोग्रॅम

वसूल दंड    : 1,30,95,000