
दुकाने व आस्थापनांवर मराठीच पाटी हवी, असे आदेश देऊनही अनेक जण दुर्लक्ष करीत असल्यामुळे पालिकेने धडक कारवाई करीत दुसऱ्या टप्प्यात 294 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत 9 हजार 798 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबईतील 36 हजार 773 आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात 1,124 आस्थापनांचा अहवाल तयार केला असता 1,124 आस्थापनांना न्यायालयात खेचण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठी नामफलक न लावणाऱ्या 638 दुकानांवर आणि आस्थापनांवर महापालिकेने न्यायालयात दावे दाखल केले असून त्यापैकी 143 आस्थापनांवरील न्यायालयीन खटल्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. तर काही प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी आलेल्या अर्जापैकी 190 आस्थापनांच्या मालकांकडून 12 लाख 23 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शॉपिंग मॉल रडारवर
पालिकेने मराठी पाटी न लावणाऱ्यांविरोधात मे महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेत कारवाई केली. आता दुसऱ्या टप्प्यात शॉपिंग मॉल, दुकाने व बड्या आस्थापनांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान एस.व्ही. रोड व एलजीएस रोडवरील तब्बल 9,798 दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात 294 दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरुपात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दुकाने व आस्थापना विभागाच्या निदर्शनास आले आहे.

























































