जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manipur-jawan

जम्मू-कश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात संयुक्त सुरक्षा दलांनी किमान दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी उधमपूर जिल्ह्यातील मजालता भागात संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत शोधमोहीम सुरू केली; त्यानंतर तिथे दहशतवाद्यांशी थेट गोळीबार सुरू झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या भागात कारवाई अजूनही सुरूच आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नेमकी ओळख पटवण्याचे काम सुरू आहे’.

सुरुवातीला ही मोहीम जम्मू-कश्मीर पोलीस आणि लष्कराच्या विशेष पॅरा कमांडोंनी सुरू केली होती. चकमक सुरू होताच तात्काळ घटनास्थळी अतिरिक्त कुमक रवाना करण्यात आली.

लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचे विशेष ऑपरेशन्स ग्रुप (SOG) यांचे संयुक्त पथक या भागात कसून तपासणी करत होते.

राजौरीमध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका संशयित ओव्हरग्राउंड वर्कर (OGW) नेटवर्कचा नुकताच पर्दाफाश झाल्यानंतर पीर पंजाल भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती; त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे.

१५ सप्टेंबर रोजी राजौरी पोलिसांनी पीर पंजाल भागात सक्रिय असलेल्या एका संशयित दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तीन जणांना अटक केली होती. झाकीर हुसेन, मोहम्मद आझम आणि मोहम्मद मुश्ताक अशी या आरोपींची नावे आहेत.

सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि उरलेल्या कोणत्याही दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच हवेतून पाळत ठेवून शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. उधमपूर-रियासी पट्ट्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर हाय अलर्ट, वाहनांची तपासणी आणि कडक नाकाबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

उधमपूर, रियासी, रामबन, कठुआ, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांतील दुर्गम डोंगराळ भागांवर सुरक्षा दलांचे विशेष लक्ष आहे, कारण या भागांमध्ये कट्टर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचाली झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून या दहशतवादविरोधी मोहिमा सुरू असतानाच सुरक्षा दलांना यश मिळाले असून, या कारवायांमध्ये काही कुख्यात दहशतवादी ठार झाले आहेत.