ऐन गणेशोत्सवात वसई, विरारकरांचा मोरयाऽऽ; ठेकेदार आणि पालिकेच्या वादात परिवहन सेवा ठप्प, हजारो नोकरदारांची कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन गणेशोत्सवामध्ये ठेकेदार आणि पालि केच्या वादात परिवहन सेवा मात्र ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून परिवहन बंद असल्याने हजारो प्रवाशांसह नोकरदारांची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत आणि परिवहनची कोलमडलेली सेवा पूर्ववत करावी, अशी आग्रहाची मागणी वसई-विरारवासीयांनी केली आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने परिवहन सेवेचा ठेका एसएनएन कंपनीकडे दिला आहे. या कंपनीमार्फत महापालिकेच्या ४० इलेक्ट्रिक बससह एकूण सुमारे १२० बस चालवल्या जातात. त्यापैकी दररोज सुमारे ७५ ते ८० बस शहरातील विविध मार्गांवर धावतात. या बसच्या दररोज सुमारे २२०० फेऱ्या होत असून जवळपास ६० ते ६५ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. परिवहन सेवेत सुमारे ५०० कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी दिली. ऐन सणासुदीच्या काळात पालिकेची परिवहन वाहतूकच बंद पडल्याने भक्तांना नाईलाजाने रिक्षाकडे आपला मार्ग वळवावा लागला आहे.

तोंडी नको लेखी आश्वासन द्या!
परिवहन कर्मचाऱ्यांना मिळत असलेले वेतन अतिशय अपुरे आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर थकबाकीदेखील असून लवकरात लवकर देणी द्यावीत या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. पण पाच दिवस उलटूनही अद्यापि महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यात तोडगा निघालेला नाही. आम्हाला तोंडी नको तर लेखी आश्वासन द्यावे त्याशिवाय एकही बस रस्त्यावर धावणार नाही, असा पवित्रा संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

रिक्षाचालक करतायेत लूट
वसई-विरारमधून नोकरी, व्यवसायासाठी मोठ्याप्रमाणात नागरिक मुंबई-ठाण्यात ये-जा करतात. याचाच गैरफायदा आता वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. अवाचेसवा भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. नियमापेक्षा जास्त भाडे घेतल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. वसईतील कोळीवाडा, पाचूबंदर, गिरीज तसेच भुईगाव या भागांत जाण्यास रिक्षाचालक तयार होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

  • महापालिकेकडून ठेकेदाराला वेळेवर देयके मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचणी निर्माण झाल्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात आला आहे.
  • परिवहन सेवा तातडीने सुरू करण्यासाठी ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवावेत, असे निर्देश देण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले.
  • मागील तीन ते चार दिवस बँका बंद असल्यामुळे काही देयके काढता आली नाहीत. संबंधित देयके लवकरच अदा करण्यात येतील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.