
अबुधाबी, शारजाह, हाँगकाँग, फ्रैंकफर्ट हॅन (जर्मनी) पाठोपाठ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कार्गो सेवा आता थेट अझरबैजानशी जोडली गेली आहे. बाकू विमानतळावरून ९० टन माल भरून निघालेल्या सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या बोईंग ७७७ एफ या मालवाहू विमानाचे मंगळवारी नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लॅण्डिंग झाले. या विमानाचा समावेश जगातील मोठ्या दुहेरी इंजिन असलेल्या विमानांमध्ये होतो. त्यामुळे या महाकाय विमानाचे विमानतळावर वॉटर कॅननची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.
नवी मुंबई विमानतळावर जगातील मोठ्या दुहेरी इंजिन असलेल्या मालवाहू विमानाचे लॅण्डिंग झाल्यानंतर या विमानाचे विमानतळ प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. या विमानाच्या लॅण्डिंगमुळे बाकू आणि नवी मुंबई कार्गो सेवेने जोडली गेली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेला चालना मिळाली आहे. या सेवेमुळे हिंदुस्थानसह युरोप आणि पश्चिम आशियातील बाजारपेठांशी मालवाहतुकीचा संपर्क वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा विमानतळ व्यवस्थानाने केला आहे.
मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे केंद्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानसेवांबरोबरच मालवाहतूक सेवांच्या विस्तारालाही प्राधान्य देण्यात येत आहे. सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या मालवाहू विमानाच्या आगमनामुळे विमानतळाच्या कार्गो सुविधांचा व्यावसायिक वापर सुरू झाला असून पश्चिम हिंदुस्थानमधील मालवाहतुकीसाठी हे विमानतळ महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.




























































