आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांचा निर्धार- मागण्या मान्य करा, अन्यथा महिना अखेरीस मुंबईकडे लाँगमार्च काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी आश्रमशाळांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींना नुकसान भरपाई द्यावी; भ्रष्ट व अनागोंदी कारभार करणाऱ्यांवर कारवाई करावी; आदिवासी विकास मंत्री, सचिव आणि आयुक्त यांनी राजीनामे द्यावेत, यासह विविध मागण्या पूर्ण करा, अन्यथा २८ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीने दिला आहे.

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये, तर जखमींना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी; सेंट्रल किचनमधील निकृष्ट, शिळे अन्न यामुळे विषबाधा होवून, आश्रमशाळांमधील गैरसोयींमुळे आजारी पडून सुमारे सहाशे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, यासह आदिवासी विकास विभागातील भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी, दोषी-बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

प्रशासनावर वचक ठेवण्यात अपयशी ठरलेले, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे मंत्री अशोक वुईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव, आयुक्त यांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी नाशिकच्या ईदगाह मैदानावर सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीने उपोषणानंतर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

बुधवारी मंत्री वुईके यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेवून चर्चा केली, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मंत्र्यांच्या आश्वासनाने समाधान झाले नाही, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे प्रशांत गावंढे, पांडुरंग गायकवाड, ललित चौधरी, सोनू गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. येत्या २८ सप्टेंबर रोजी नाशिकहून मुंबईकडे राज्यभरातील विद्यार्थी पायी मोर्चाने निघतील. मुंबईत राजभवनावर धडक देवून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा देण्यात आला.