शीव रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीला वेग, १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणी कामाने वेग घेतला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत पुलाच्या सर्व बाजूची कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६वी) टाकण्यात येत आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून शीव स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाची पुनर्बाधणी करण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले आहे. तसेच, हा पूल ११२ वर्षे जुना व धोकादायक ठरल्याने त्याची पुलाची पुनर्बाधणी करण्याचे ठरले.

रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बाधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महापालिका हद्दीतील अॅप्रोच रोडच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महापालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन उड्डाणपूल ५४.५ मीटरचा एकच लांब स्पॅन (सिंगल स्पॅन) आणि २९ मीटर रुंदीचा आहे. या आराखड्यानुसार पुलाखाली खांब नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.

शीव रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पुलाच्या पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहीदास मार्ग (धारावी) पर्यंतच्या पोहोच रस्त्याचे पुनर्बाधकाम हे पालिकेमार्फत अंतिम टप्प्यात आहे.

निविदेनुसार या पुलाच्या पुनर्बाधणीचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, त्याआधीच हा पूल सुरू करण्याचे निर्देश प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर गुरुवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले.