
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा नियमबाह्य लाभघेणाऱ्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली ५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल न करता माफ करण्याचा महायुती सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तो पैसा जनतेच्या घामाचा असल्याने या संपूर्ण गैरव्यवस्थापनावर तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीप्रमाणे सुमारे २० लाखांपेक्षा जास्त अपात्र लाभार्थ्यांना किमान १७ महिने दरमहा दीड हजार रुपये मिळाले. हा आकडा ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होतो.
लाभघेणाऱ्या पुरुषांना वगळता इतरांनी घेतलेली ती रक्कम वसूल न करता माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होणार असल्याने प्रशासकीय वर्तुळात आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करून या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.
निष्पक्ष चौकशी करून जनतेसमोर सत्य मांडा
या गोंधळात अनेक खऱ्या, वंचित आणि गरजू महिलांचा हक्क तांत्रिक त्रुटींमुळे हिरावला गेला, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने कोणतीही लपवाछपवी न करता खरी व निर्दोष आकडेवारी जाहीर करावी, योजनेवर तत्काळ ‘श्वेतपत्रिका’ काढावी आणि ५ हजार कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





























































