शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी घरी नेता येणार, शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनाला चालना देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळांना यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कायमस्वरूपी घरी नेता येणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस विद्यार्थ्यांकडून हे साहित्य परत घेऊ नये, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच ‘निपुण भारत’ अभियानाच्या अनुषंगाने शाळांना भाषा, गणित आणि विज्ञान विषयांसाठी विविध प्रकारचे पूरक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मार्च २०२३ पूर्वी प्राप्त झालेले आणि वापरण्यायोग्य असलेले साहित्य विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी देण्यात यावे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या साहित्याचा विद्यार्थ्यांनी घरी नियमित सराव करावा, यासाठी वर्गशिक्षकांनी पालकांशी संवाद साधून आवश्यक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतील अभ्यासाला घरच्या स्वयंअध्ययनाची जोड मिळणार आहे.

नवीन पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम विकसित होत असताना पूर्वीचे वापरण्यायोग्य साहित्य विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सरावासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे उपलब्ध साहित्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अधिक प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

बाद करण्यात येणाऱ्या साहित्याची शाळेच्या साठा नोंदवहीत आवश्यक नोंद घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांमधील जुन्या साहित्याचा साठा कमी होण्याबरोबरच उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करण्यास मदत होणार आहे.

तीन वर्षांपेक्षा जुने साहित्य बाद करण्याची मुभा
शाळांमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक काळ वापरात असलेले अथवा खराब झालेले शैक्षणिक साहित्य तपासून रद्द करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये पडून असलेले खराब आणि वापरास अयोग्य साहित्य हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.