
राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण भागासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारखी उभी पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग… pic.twitter.com/vVneKhV5VP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 18, 2026
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी पवार यांनी केली आहे. तसेच गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. पीकविमा योजनेबाबतही पवार यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत. एक रुपयातील पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, तसेच शेतकरी हिताचे पूर्वी वगळलेले सर्व ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती, जलसंधारण तसेच इतर कामे सुरू करावीत. फळबागा वाचवण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून गरजेनुसार शासकीय टँकर सुरू करावेत. तसेच मागणीनुसार चारा छावण्या सुरू करून पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि आवश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण जनजीवनावर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


























































