
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे. कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश प्रशासनाने काढले असून याचा फायदा सुमारे तीन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. आश्वासित प्रगती योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभमिळावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार युनियनने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे पदाधिकारी सचिन बासरे, सुरेश तेलवणे, अजय पवार, सुनील पवार तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आश्वासित प्रगती योजनेच्या थकबाकीचा प्रश्न प्रशासनाकडे सातत्याने लावून धरला होता. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना त्याची फरकाची थकबाकी मिळावी, अशी मागणी युनियनच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने आज १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याचे आदेश दिले.
आयुक्तांचे मानले आभार
गणेशोत्सवाच्या काळातच हा निर्णय झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाबद्दल युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, सुरेश बनसोडे, सहाय्यक आयुक्त वासंती ठोंबरे, राजू धराडे, संजय गोरुले आणि राहुल चव्हाण यांचे जाहीर आभार मानण्यात आले, असे युनियनचे अध्यक्ष बाळ हरदास आणि पदाधिकारी सचिन बासरे यांनी सांगितले.



























































