बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’! ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नाव ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ तर निवडणूक चिन्ह ‘फुटबॉलपटू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी नावं दिली होती. आता पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ पक्ष असे नाव देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ असे चिन्ह देण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि निवडणूक चिन्ह दिले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. तर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यापूर्वी ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे अधिकृत नाव आणि ‘फुले व गवत’ हे पक्षाचे पारंपरिक निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवले होते. दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि मुक्त चिन्हांच्या यादीतून पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.

या अंतरिम व्यवस्थेनुसार आगामी पोटनिवडणुकांमध्ये दोन्ही गटांना वेगवेगळ्या नाव आणि चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. पक्षाच्या नाव आणि चिन्हावर दोन्ही गटांनी केलेल्या दाव्याबाबत निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.