विसर्जनाची जय्यत तयारी; 383 कृत्रिम तलाव सज्ज, मुंबई शहर आणि उपनगरात 67 नैसर्गिक विसर्जनस्थळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आणि विविध सेवा-सुविधांसह साजरा करण्यासह विसर्जन मिरवणुकांसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी  पालिकेकडून यंदा 383 हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी एकूण 67 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विसर्जनासाठी समुद्र किनारे, नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ 2) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक  प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

विसर्जनासाठी यंदा 44 समुद्र किनारे तसेच जेट्टी, 23 नैसर्गिक तलाव असे एकूण 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्थळांवर 1 हजार 194 स्टील प्लेट, 23 जर्मन तराफा.

34 क्रेन, 85 रुग्णवाहिका, 10 मोटरबोट, 498 निर्माल्य कलश, 326 निर्माल्य डंपर, 261 स्वागत कक्ष, 228 नियंत्रण कक्ष, 75 निरीक्षण मनोरे, 1 हजार 132 जीवरक्षक, 6 हजार 52 फ्लड लाईट/सर्च लाईट, 489 तात्पुरती प्रसाधनगृहे, पालिकेचे तब्बल 25 हजार अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था कार्यरत राहणार आहेत.

6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

गिरगाव चौपाटी येथे 12 कृत्रिम तलाव 

मुंबईत सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे होते. त्यामुळे याठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. n समुद्र किनारपट्टीवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर दिसून येतो. मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. n पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून श्रीगणेशोत्सव मंडळातील किमान 8 ते 10 स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एक गणपती; एक झाड

यंदा विसर्जित होणाऱया श्रीगणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती-एक झाड’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रत्येक श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासोबत एक झाड लावून मुंबईच्या हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा हा उपक्रम आहे.