
मुंबईकरांचा बेस्ट बस प्रवास दिवसेंदिवस अधिक असुरक्षित बनत आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या अपघातांचे सत्र सुरूच राहिले असून गुरुवारी मध्यरात्री मानखुर्द परिसरात कंत्राटी बस मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. रस्त्याने चालणाऱया चार पादचाऱयांना वाचवण्यासाठी चालकाने बसचा ब्रेक अचानक दाबला. त्यात गाडी खांबावर आदळून झालेल्या अपघातात एक प्रवाशी जखमी झाला. चार दिवसांत हा दुसरा अपघात झाला.
बस मार्ग क्रमांक 501वरील बस ऐरोली बस स्थानकावरून प्रतीक्षा नगर आगाराकडे जात होती. याचदरम्यान मानखुर्द पुलाजवळील खांबाला बसची धडक बसली. अपघातग्रस्त बस मातेश्वरी पंपनीची भाडेतत्त्वावरील बस आहे. बस मानखुर्द स्थानक पुलाजवळ पोहोचली असता चार पादचाऱयांनी अचानक डाव्या बाजूने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्या पादचाऱयांना बसची धडक बसू नये म्हणून चालकाने अचानक ब्रेक लावला. त्या वेळी बस मानखुर्द मेट्रो स्थानकाच्या खांबावर धडकली. या अपघातात बसमधील प्रवाशाच्या डाव्या मनगटाला आणि डाव्या मांडीला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात नेण्यात आले होते. शहर आणि उपनगरांत कंत्राटी बसच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच गोरेगावमध्ये दिंडोशीजवळ बसची मेट्रो मार्गिकेच्याच खांबाला धडक बसली होती.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
बस अपघाताची नोंद मानखुर्द पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू करीत बस कर्मचाऱयांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच जखमी प्रवाशी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश साठे यांनी सांगितले. अपघातग्रस्त बस शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता बेस्टच्या टोइंग वाहनाच्या मदतीने प्रतीक्षा नगर आगारात आणण्यात आली.






























































