
मीरा रोडच्या नयानगर परिसरात अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत तब्बल ८ लाख २७ हजार ८८० रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. वीजचोरीच्या दोन स्वतंत्र घटनांप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नयानगर येथील बानेगर स्कूलजवळ असलेल्या निदा पार्क को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील एका गाळ्यात २ सप्टेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वीजचोरी झाल्याचे तपासणीत आढळून आले. तपासणीत तब्बल २५ हजार ७८९ युनिट वीज अनधिकृतपणे वापरल्याचे समोर आले असून त्याची किंमत अंदाजे ५ लाख ८५ हजार १०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नावेद इकबाल कुरेशी, मोहम्मद ओवेसी अन्वर पारवे आणि गौस मोहम्मद अली शेख यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे करत आहेत.
मीटरमध्ये फेरफार
नयानगरमधील मीरा नर्सिंग होम लेन येथील न्यू राहुल को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये वीजचोरी उघडकीस आली. या ठिकाणी १० जुलै २०२३ ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अधिकृत वीज मीटरमध्ये बेकायदेशीर फेरफार करून वीजचोरी केल्याचा आरोप आहे. तपासणीत १२ हजार १२० युनिट वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याची किंमत अंदाजे २ लाख ४२ हजार ७८० रुपये आहे. याप्रकरणी अहमद अब्दुल्ला शेख याच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तलवारे करत आहेत































































