
<< डॉ. ब्रह्मदीप आलुने
जागतिक राजकारणाच्या पटावर जे दिसते, त्यापेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली अनेकदा अधिक निर्णायक असतात. युक्रेनच्या रणभूमीवर अमेरिका आणि रशिया परस्परविरोधी बाजूंना उभे आहेत, इराणच्या प्रश्नावरही दोघांचे हितसंबंध वेगळे आहेत. तरीही ‘सीआयए’चे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांमधील संवादाने एका नव्या समीकरणाची चर्चा सुरू केली आहे. ट्रम्प यांना इराणच्या आघाडीवर निर्णायक यश हवे आहे, तर पुतीन यांना युक्रेनचा निकाल आपल्या सामरिक हिताला अनुकूल हवा आहे. म्हणूनच मॉस्कोतील हा गुप्तचर संवाद महासत्तांची पडद्यामागील खेळी असण्याची शक्यता आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या जगात मैत्रीपेक्षा राष्ट्रीय हिताला अधिक किंमत असते. देशाच्या दूरगामी हितासाठी प्रसंगी मित्रालाही बाजूला सारण्याची तयारी ठेवावी लागते. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील मैत्रीपूर्ण समीकरणाची चर्चा जगाला नवी नाही. आज मात्र दोघांसमोर असलेल्या राजकीय आणि सामरिक गरजा अशा वळणावर आल्या आहेत की, एका नेत्याचे यश दुसऱ्याच्या सहकार्यावर अवलंबून राहू शकते. ट्रम्प यांना इराणविरुद्धच्या संघर्षात निर्णायक सरशी मिळवून तिचा राजकीय लाभ घ्यायचा आहे, तर पुतीन यांचे युक्रेनविषयीचे गणितही यापेक्षा फारसे वेगळे नाही. इराणमध्ये सत्तांतर झाले तर ट्रम्प यांच्यासाठी ती मोठी उपलब्धी ठरू शकते आणि युक्रेनमधून अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची गच्छंती झाली तर पुतीन यांच्यासाठी तो मोठा विजय असेल. या दोन उद्दिष्टांसाठी ट्रम्प आणि पुतीन परस्परांना मदत करण्याचा काही मार्ग शोधत आहेत काय, हा प्रश्न म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. अमेरिकेच्या ‘सीआयए’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांचा अलीकडचा मॉस्को दौरा आणि रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांशी झालेला त्यांचा संवाद या संशयाला पुष्टी देणारा आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, ही उक्ती जुनी असली तरी गुप्तचर यंत्रणांच्या व्यवहाराला ती अधिक चपखल लागू होते. सार्वजनिक व्यासपीठांवर परस्परांविरुद्ध कठोर भूमिका घेणारे देशही पडद्यामागील संपर्काचे मार्ग सहसा पूर्णपणे बंद करीत नाहीत. रॅटक्लिफ यांनी रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याला त्यामुळे महत्त्व आहे. रशियाच्या परदेशी गुप्तचर सेवेचे म्हणजे ‘एसव्हीआर’चे प्रमुख सर्गेई नारिश्किन यांनीही या संवादाला दुजोरा दिला आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत ‘सीआयए’च्या प्रमुखांचा रशियाशी झालेला संपर्कही सहज दुर्लक्ष करता येण्यासारखी बाब नाही.
रॅटक्लिफ यांच्या आताच्या मॉस्को संपर्काला याच इतिहासाची पार्श्वभूमी आहे, पण वर्तमानातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. युक्रेन युद्धाने अमेरिका आणि रशियाला परस्परविरोधी बाजूंवर उभे केले. तथापि, युद्ध लांबत गेल्याने ते संपविण्यासाठी संवादाची गरजही वाढत चालली आहे. युक्रेन युद्ध संपविता आले तर ट्रम्प यांना ते आपल्या परराष्ट्र धोरणातील मोठे यश म्हणून मांडता येईल. पुतीन यांना मात्र युद्धाचा असा शेवट अपेक्षित असेल, ज्यात रशियाने मिळविलेली सामरिक किंवा प्रादेशिक स्थिती कमजोर होणार नाही. दोघांची उद्दिष्टे एकसारखी नाहीत, अनेक बाबतींत ती परस्परविरोधी आहेत. तरीही युद्धाच्या समाप्तीची गरज त्यांना एका व्यवहाराच्या दिशेने घेऊन जाऊ शकते.
अशा वेळी औपचारिक मुत्सद्देगिरीपेक्षा गुप्तचर यंत्रणांचे मार्ग काही बाबतींत अधिक उपयोगी ठरतात. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतील प्रत्येक शब्दाला अधिकृत भूमिकेचे वजन असते. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संवादात मात्र संभाव्य पर्यायांची चाचपणी करता येते, दुसऱ्या बाजूची मर्यादा समजून घेता येते आणि कोणतीही सार्वजनिक बांधिलकी न स्वीकारता संदेश पोहोचविता येतात. युद्धाच्या निर्णायक टप्प्यांवर अशा संपर्कांचे महत्त्व म्हणूनच वाढते. या समीकरणातील दुसरा संवेदनशील दुवा म्हणजे इराण. अमेरिका आणि इराणमधील तणाव, रशिया-इराण सामरिक संबंध आणि पश्चिम आशियातील वेगाने बदलणारा सत्ता समतोल यांचा परिणाम रशिया व अमेरिका या दोघांच्याही गणितांवर होतो. अमेरिकेला इराणमध्ये निर्णायक सामरिक यश मिळवायचे असेल तर तेहरानवरील रशियाचा प्रभाव आणि मॉस्कोचे हित दुर्लक्षित करता येणार नाही. रशियालाही युक्रेनच्या पलीकडे पश्चिम आशियातील आपले स्थान जपावे लागणार आहे. त्यामुळे इराणचा प्रश्न हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाबरोबरच तो अमेरिका-रशिया व्यवहाराचाही एक भाग बनण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर रॅटक्लिफ यांच्या संवादात इराणमधील सत्तांतर किंवा युक्रेनमधून अध्यक्ष झेलेन्स्की यांची गच्छंती अशा शक्यतांवर चर्चा झाली असावी, असा तर्क मांडला जात आहे. त्यासंबंधी अधिकृत तपशील समोर आलेले नसले तरी या शक्यता ट्रम्प आणि पुतीन यांच्या राजकीय गणितांशी थेट जोडलेल्या आहेत.
महासत्तांनी दुसऱ्या देशांतील राजकीय परिस्थिती आपल्या हिताला अनुकूल करण्याचे प्रयत्न केलेले नाहीत, असे इतिहास सांगत नाही. नेतृत्वबदल, सत्तांतर किंवा राजकीय दबाव हे अनेकदा व्यापक भू-राजकीय संघर्षाचे साधन बनले आहेत. अशा हालचाली प्रत्येक वेळी विचारसरणीतूनच घडतात असेही नाही. सामरिक भूगोल, लष्करी गरज, ऊर्जा, प्रभावक्षेत्र आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हित यांचा त्यामागे मोठा वाटा असतो. रॅटक्लिफ यांच्या मॉस्को संपर्काला त्यामुळे केवळ दोन गुप्तचर प्रमुखांमधील नियमित संवाद समजून दुर्लक्ष करता येत नाही. या घडामोडींचा महत्त्वाचा अर्थ ट्रम्प आणि पुतीन यांच्या सार्वजनिक भूमिकेपलीकडेही संवादाचे एक स्वतंत्र क्षेत्र अस्तित्वात असल्याची शक्यता आहे. दोघेही राष्ट्रीय हिताला अग्रक्रम देणारे आणि त्यासाठी व्यवहाराची चौकट बदलण्यास मागेपुढे न पाहणारे नेते आहेत. गुप्तचर यंत्रणाही याच सत्ताव्यवहाराचा अत्यंत संवेदनशील भाग असतात. मित्रत्व टिकविणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी नसते, राष्ट्राचे हित जपणे हे त्यांचे कर्तव्य असते.
गुप्तचर संस्थांच्या बैठकीचे महत्त्व म्हणूनच त्या बैठकीनंतर प्रसिद्ध होणाऱ्या निवेदनातून फारसे कळत नाही. अशा संपर्कांचा अर्थ पुढील काही महिन्यांत घडणाऱ्या घटनांमधून उलगडत जातो. अमेरिका आणि रशिया आजही प्रतिस्पर्धी आहेत, परंतु प्रतिस्पर्ध्यांमध्ये संवाद नसतोच असे नाही. उलट दावणीला मोठे सामरिक हित बांधलेले असेल तेव्हा असा संवाद अधिक आवश्यक होतो. या निःशब्द मुत्सद्देगिरीचे पडसाद युक्रेन किंवा इराणपुरते मर्यादित राहतीलच असे नाही, व्यापक जागतिक सत्ता समतोलावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो.
इराण हा रशियाचा सामरिक भागीदार आहे, तर युक्रेन अमेरिका आणि युरोपच्या सुरक्षा व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक. अशा स्थितीत इराण आणि युक्रेन या दोन्ही देशांत सत्तांतर झाले व नव्या राजवटी अनुक्रमे अमेरिका व रशियाच्या हिताला अनुकूल ठरल्या, तर ट्रम्प आणि पुतीन या दोघांसाठीही ते असाधारण राजकीय यश ठरेल. दुसऱ्या देशांतील अस्थिरता किंवा सत्ताबदल आपल्या हितासाठी वापरण्यापासून महासत्ता इतिहासात अलिप्त राहिलेल्या नाहीत. अशा बदलांना विचारसरणीपेक्षा भू-राजकीय गरजा अधिक वेगाने दिशा देतात. ट्रम्प आणि पुतीन हे सत्तेच्या या कठोर व्यवहाराचे मुरब्बी खेळाडू मानले जातात. त्यामुळे मॉस्कोतील हा संवाद नेमका कशासाठी होता, याचे उत्तर उद्याच्या इराण आणि युक्रेनमधील घडामोडींमध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)



























































