
मलेशियात महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सव 2026 अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सेन्तुल येथील एसडीएसकेएल श्री लक्ष्मी नारायण मंदिरात आयोजित या सोहळ्यास 550 हून अधिक भाविकांची उपस्थिती लाभली होती. मलेशियात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसह विविध हिंदुस्थानी समुदायांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास हिंदुस्थानचे मलेशियातील उपउच्चायुक्त हितेश राजपाल आणि त्यांच्या पत्नी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गणरायाचे आगमन व पूजन करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशा आणि झेंडा पथकाच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा निनाद, भगव्या झेंड्यांची दिमाखदार मिरवणूक आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला. महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्सवाचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
यंदाच्या गणेशोत्सवाची ‘भारताचे रंग, बाप्पाचे संग’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. हिंदुस्थानच्या विविध राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा परिचय याद्वारे करून देण्यात आला. विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या या संकल्पनेला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात लहान मुलांनी आणि तरुणांनी विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांवर आधारित नृत्ये, नाटिका आणि कला सादरीकरणे केली. या माध्यमातून भारतीय संस्कृतीची समृद्ध विविधता प्रभावीपणे मांडण्यात आली.
मलेशियात महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव भक्तिभावात आणि उत्साहातhttps://t.co/kPJLvlsCDa pic.twitter.com/WBEdmB3wZK
— Saamana Online (@SaamanaOnline) September 23, 2026
मलेशियाच्या परदेशी भूमीत मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याच्या महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या प्रयत्नांना या गणेशोत्सवाद्वारे नवी ऊर्जा मिळाली आहे. भक्ती, परंपरा, कला आणि सामुदायिक एकतेचा हा संगम सर्व सहभागींसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.



























































