
‘दुष्काळाचे संकट अतिशय मोठे असून अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱयांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मदत कधी पडणार हे स्पष्टपणे सांगावे,’ असे आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले. शेतकऱयांसाठी शिवसेना लवकरच मदत केंद्रे सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी आज सोलापूर जिह्यातील बोरामणी, मराठवाडय़ातील औसा तालुक्याच्या तावशीताड, तुळजापूर तालुक्यातील खानापूर, लोहारा तालुक्यातील आष्टामोड, पंधार तालुक्यातील गऊळ तर वसमत तालुक्यातील माळवटा येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱयांनी कर्जमाफी, पीक विमा तसेच बँकांकडून येणाऱया नोटिसांच्या व्यथा मांडल्या. गऊळ येथे योगेश गिरे या तरुणाने आपली व्यथा मांडली. वडिलांवर तीन लाखांचे कर्ज आहे. माझे शिक्षण, दोन बहिणींचे लग्न कसे करायचे? वडील रात्री-अपरात्री बेचैन होऊन उठतात. त्यांनी काही केले तर आम्ही कुणाकडे पाहायचे, अशी व्यथा त्याने मांडली. या दौऱयात शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, उपनेत्या व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख दत्ता माने, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज पेंगनाळकर उपस्थित होते.
कोविडसारखी परिस्थिती
ही कोविड महामारीसारखीच परिस्थिती आहे. या संकटाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भयावह परिणाम होणार आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राच्या निधीचा वापर करण्यात यावा. या प्रश्नावर सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. ’कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत,’ असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले. कर्जमाफीच्या विषयावरून बँकांनी शेतकऱयांना त्रास देणे थांबवावे, अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने समाचार घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
डबडबलेल्या डोळ्यांनी पोटतिडकीने मांडली दाहक स्थिती
बोरामणी गावातील महिला आणि पुरुष शेतकऱयांनी अक्षरशः डबडबलेल्या डोळ्यांनी दुष्काळाची दाहक स्थिती मांडली. ‘पावसाअभावी पिके करपून गेली. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, काय खावं? अशा परिस्थितीत जगायचं कसं हा प्रश्न आहे,’ अशी व्यथा महिलांनी मांडली. सरकारने कर्जमाफी केली, पण ती बँकेतच जमा झालेली नाही. कर्जमाफीचा लाभ अजून मिळालेला नाही,’ असेही शेतकऱयांनी सांगितले. ‘गेल्या वर्षीच्या ओल्या दुष्काळाची मदत अजून मिळालेली नाही. यंदा खरीप पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. सरकारने नुसते पंचनाम्याचे सोंग न घेता थेट मदत द्यावी. सरकारने मरणाची वाट न पाहता मदत द्यावी. तसेच जनावरांना चारा आणि पाण्याची सोय करावी; अन्यथा जनावरे सोडून द्यावी लागतील,’ अशा व्यथा मांडल्या.

























































