
शाळेच्या दाखल्यावर मारवाडी मातृभाषा असल्याची नोंद असल्याने राज्य सीईटीने एका विद्यार्थिनीचा गुजराती महाविद्यालयातील अभियांत्रिकी प्रवेश रद्द केला. याविरोधात विद्यार्थिनीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावरील संपूर्ण युक्तिवाद ऐकून न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला आहे.
या विद्यार्थिनीला डिप्लोमाला 92 टक्के गुण मिळाले. त्याआधारावर तिने पदवी अभ्यासक्रमासाठी विलेपार्ले येथील एका गुजराती अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र या विद्यार्थिनीच्या शाळेच्या दाखल्यावर मातृभाषा ‘मारवाडी’ असल्याचा उल्लेख आहे, असे सांगत राज्य सीईटीने हा प्रवेश रद्द केला.
त्याविरोधात विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. रियाज छागला व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रवेश रद्द करण्याआधी या विद्यार्थिनीची बाजू ऐकलीत का, असा सवाल न्यायालयाने सीईटीला केला.
आपले म्हणणे सादर करण्याची पूर्ण संधी या विद्यार्थिनीला देण्यात आली होती, असा दावा सीईटीने केला. याबाबत असलेल्या राज्य शासनाच्या नियमांची माहिती ऍड. अनिरुद्ध गर्गे यांनी न्यायालयाला दिली. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला.























































