
हिंदुस्थानने कबड्डीमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व राखत दुहेरी सुवर्ण धडाका आशियाई क्रीडा स्पर्धेत दाखवून दिला. हिंदुस्थानच्या महिलांनी अखेरच्या मिनिटांमध्ये सलग गुण मिळवून इराणविरुद्धची फायनल 37-34 ने जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतर पुरुष संघानेही अंतिम सामन्यात इराणला 40-34 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. इराणने हिंदुस्थानला कडवी झुंज देत मध्यंतरापर्यंत 18-17 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात हिंदुस्थानने जोरदार पुनरागमन करत इराणला पूर्णपणे निष्प्रभ करून आघाडी घेत सुवर्णपदक मिळवले. हिंदुस्थानच्या नावावर एकूण 30 पदके जमा झाली आहे.
पहिल्या हाफच्या अखेरीस इराणने 18-17 अशी आघाडी घेत हिंदुस्थानला धक्का दिला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाही इराणने दबाव कायम ठेवला, मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी हार मानली नाही. सुमितने बचावात भक्कम भिंत उभी केली, तर अर्जुन देशवालने आक्रमणात गुणांची बरसात सुरू ठेवली. 21-21 अशी बरोबरी साधल्यानंतर हिंदुस्थानने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर इराणच्या प्रत्येक चालीला हिंदुस्थानी बचावाने चोख प्रत्युत्तर दिले. अखेर हिंदुस्थानने 40-34 असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
महिलांचाही इराणला दणका
महिला अंतिम सामन्यातही इराणने हिंदुस्थानला सहज विजय मिळू दिला नाही. सामन्यात अनेकदा आघाडीचे पारडे बदलले. इराणने पुनरागमनाचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र निर्णायक क्षणी हिंदुस्थानी बचावपटूंनी शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी टिकवत हिंदुस्थानने 37-34 असा विजय मिळवला आणि महिलांनीही सुवर्णपदकावर कब्जा केला.























































