पुण्यात डीजेचा गोंगाट सगळे नियम पायदळी, 35 तास चालली मिरवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या बाप्पाला वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने वाजतगाजत निरोप देण्यात आला आणि 12 दिवस अखंडपणे सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली. डीजेच्या दणदणाटात सगळे नियम पायदळी तुडवत शुक्रवारी सकाळी 8 वाजून 43 मिनीटांनी सुरू झालेली मिरवणूक 35 तासांनी संपली. शेवटच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी रात्री 7.33 वाजता झाले. गेल्या वर्षी 32 तास 26 मिनिटे विसर्जन मिरवणूक चालली होती.

सनई-चौघडय़ांचे मंगलसूर, ढोलताशांचा गजर, झांज, लेझीम, टिपऱ्या, बँडवर वाजणाऱ्या गाण्यांची धून, रांगोळय़ांच्या पायघडय़ा, लक्षवेधक चौकाचौकात रेखाटलेले देखावे, गुलालाची मुक्त उधळण… अशा दिमाखात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग सजविण्यात आला होता. सूर्यास्तानंतर डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणारी तरुणाई मनसोक्त आनंद घेताना दिसली. पारंपरिक पालखीतून पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे मंडई येथे आगमन झाले, टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रींची आरती करण्यात आली. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 9.45 वाजता जोगेश्वरी चौकातील मांडवातून सुरुवात झाली. सकाळी 10.30 वाजता मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली. ‘माता महाकाली’ रथात विराजमान झालेल्या बाप्पाचे रूप विलोभनीय दिसत होते. मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाची श्री विष्णु रथातून वैभवशाली विसर्जन मिरवणूक निघाली. रथावर कमळाच्या फुलात गणराय विराजमान झालेली मूर्ती खूपच सुंदर दिसत होती. त्यानंतर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, त्वष्टा कासार, बाबू गेनू गणपती मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. महाराष्ट्र तरुण मंडळ काशेवाडी गणपतीचे शेवटी विसर्जन झाले.