
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. उपक्रमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 53 हजार 862 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे 29 लाख 77 हजार 670 भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या आजारांची तपासणी
शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनी विकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
समन्वय समितीनेपोलीस, पालिकेचे मानले आभार
गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱया सर्वांचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने आभार मानले आहेत. गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी महाराष्ट्र शासन, मुंबई पालिका, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बेस्ट, एमपीसीबी तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे. राज्य शासन, मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, प्रशासनातील अधिकारी आणि सर्व विभागांच्या कर्मचाऱयांनी गणेश मंडळांच्या अडचणी समजून घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी आभार मानले.
























































