
लग्नाला चार वर्षे झाली तरी अपत्य होत नव्हते. त्यात घरचे त्यावरून सतत बोलत होते. त्यामुळे मानखुर्दच्या पीएनजीपी कॉलनीत भाडय़ाने राहणाऱ्या त्या दाम्पत्याने पालकांसमवेत बाजार करायला आलेल्या दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्या बाळाला घेऊन ते बिहारला गावाला पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी कसून शोध घेत अवघ्या 40 तासांत दाम्पत्याला पकडून मुलाची सुटका केली.
23 तारखेला संध्याकाळी मानखुर्दमध्ये राहणारे एक दाम्पत्य त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन मार्केट रोड परिसरात खरेदीसाठी गेले होते. आई-वडील खरेदी करत असताना शेजारीच मुलगा उभा होता. दरम्यान त्यावेळी तेथून जाणाऱ्या मुस्कान साह व तिचा पती भोलाकुमार साह यांच्या नजरेस तो मुलगा पडला. दोघांनी त्या मुलाला उचलून पोबारा केला. थोडय़ा वेळाने आई-वडिलांनी पाहिले असता मुलगा नसल्याचे आढळून आले. त्यांनी शोधाशोध केली, पण त्याचा उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी मानखुर्द पोलिसांनी तक्रार दिल्यानंतर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध पोलीस ठाण्यांची पथके तयार करून मुलाचा शोध सुरू केला. पीएमजीपी कॉलनीत कसून शोधमोहीम राबविल्यानंतर अखेर मुस्कान आणि भोलाकुमार हे दोघे सापडले. त्यांच्याजवळ अपहरण केलेला मुलगादेखील सुखरूप मिळाला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. भोला आणि मुस्कान यांचा कट पोलिसांनी अवघ्या 40 तासांत उधळून लावला.























































